India vs New Zealand semi-final 2023: विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची तुफानी शतकीय खेळी, मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर पडला धावांचा पाऊस.

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये 50वे शतक साजरे केल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करतांना विराट, तर दुसऱ्या छायाचित्रात सचिन तेंडुलकरला वंदन करतांना विराट.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने फोडला न्यूझीलंडला घाम

India vs New Zealand यांच्यात 15 नोवेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या बाद फेरीच्या थरारक सामन्यात विराट कोहली आणि श्रेयश अय्यर यांच्या झुंजार खेळीने आसमंत दणाणून सोडला. भारताकडून प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीला सुरुवात झाली होती. त्यात सलामीला रोहित शर्मा आणि युवा खेळाडू शुभमन गिल कडून डावाची चांगली सुरुवात झाली.

सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडून रोहित शर्माने कुठलेही दडपण न घेता धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. 2019च्या वर्ल्डकप मध्ये ज्या ट्रेंट बोल्टने रोहित, विराट आणि राहुल यांना लवकर तंबूचा रस्ता दाखवून भारताच्या टॉप ऑर्डरला नेस्तनाबूत केले होते त्याच ट्रेंट बोल्टला रोहितने चौकार षटकार लगावत 2019च्या वर्ल्डकप मधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचे संकेत दिले आणि टीम सौदीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित 47 धावांवर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर गिलने आक्रमणाचा पवित्र स्वीकारला, बघता बघता गिल शतकांचा जवळ पोहोचला असतांना पायाचे स्नायू अखडल्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आले.

शतक झळकवल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करतांना श्रेयश

image source

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या थरकाप उडवणाऱ्या सामन्यामध्ये श्रेयश अय्यरने घरच्या मैदानावर फक्त 70 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने वेगवान शतकी खेळी करून भारताला नेहमीच धोकादायक ठरणाऱ्या न्यूझीलंडचा चांगलाच समाचार घेतला. श्रेयश आणि विराट यांच्या जोडीने दीडशतकीय भागीदारी रचत भारताची धावसंख्या 400 च्या आसपास जाणार याचा अंदाज आपल्या खेळीतून दिला. अखेरच्या काही षटकांत केएल राहुलने आक्रमक फटकेबाजी करीत 20 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले.

कोहलीचे ‘विराट’ विक्रम

आपल्या खास शैलीत वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर पाऊल ठेवलेल्या विराट कोहलीने विराट खेळी करून एकाच सामन्यात तब्बल तीन रेकॉर्ड मोडीत काढले तेही सचिन तेंडुलकरचेच.

किंग कोहली भारतीय क्रिकेटचाच नव्हे अख्या क्रिकेट जगताचा राजा झाला आणि ज्याला लहानपणापासून आपला हीरो मानले त्याच सचिनचा 49 एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला आणि 50 वे शतक झळकवल्यानंतर त्याच सचिनसमोर भर मैदानात नतमस्तक होत विराटने जी कृती केली त्याने सचिनचीच नाही तर करोडो चाहत्यांची मने जिंकली .

  • विराट कोहलीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज मुंबईकर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडून एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक 50 शतक ठोकून शतकांचे ‘अर्धशतक’ आपल्या नावावर केले.

  • तसेच विराटने 2003 च्या वनडे वर्ल्डकप सामन्यातील सर्वाधिक 7 अर्धशतक असलेल्या सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडून वनडे वर्ल्डकप सामन्यात 8 अर्धशतकांची किमया आपल्या नावावर केली.

  • विराटने सचिनचा 2003 च्या वर्ल्डकपमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक 673 धावांचा असलेला रेकॉर्ड 711 धावा जमवून मोडून काढला आणि एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमाला गवसणी घातली.

बॉलीवुड कलाकारांची हजेरी

India vs New Zealand यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईतील विविध बॉलीवुड कलाकारांनी दिमाखात हजेरी लावली होती. त्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता रणबीर कपूर, शाहिद कपूर, मीरा कपूर, सिध्दार्थ मर्ल्होत्रा, कियारा आडवाणी, मुकेश अंबानींचे सुपुत्र आकाश अंबानी, जॉन अब्राहम यांच्यासमवेत आणखी बॉलीवुड कलाकार उपस्थित होते.

महाराष्ट्राचे नेतेदेखील होते उपस्थित

बॉलीवुड कलाकारांबरोबर या थरारक सामन्याचे साक्षीदार होण्याचा अनुभव महाराष्ट्रातील नेत्यांनीदेखील घेतला त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे मंत्री मा.श्री प्रफुल्ल पटेल देखील होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र मा.श्री तेजस ठाकरे यांनी देखील सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये हजेरी लावली होती.

Share this post

Leave a comment